नांदेड – मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१ वर्षे, रा. शारदानगर, नांदेड) यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. ३ जून २०२६) आरोपीच्या शारदानगर येथील राहत्या घरी करण्यात आली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे हुतात्मा माधव विद्यालय मुखेड येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. आरोपी मुख्याध्यापक पडलवार यांनी तक्रारदाराकडे विद्यालयाच्या शालेय खर्चाच्या नावाखाली प्रतिमहिना १२ हजार रुपये प्रमाणे जानेवारी ते मे २०२६ अशा पाच महिन्यांच्या हप्त्याची, तसेच तक्रारदाराची बदली करून देण्यासाठी व त्यांना नोटीस न देण्यासाठी एकूण ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून लिपिकाने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.
लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, मुख्याध्यापकाने शासकीय पंचांसमक्ष ६० हजारांऐवजी तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार बुधवारी शारदानगर येथील आरोपीच्या निवासस्थानी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पडलवार यांना रंगेहात अटक केली. लाचेची रक्कम आणि आरोपीची अंगझडती घेऊन मोबाईल व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, सध्या त्यांच्या घराची झडती आणि विमानतळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






