नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक
Nanded Vruttavedh
नांदेड – जिल्हा पोलीस आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कामगिरी करत पंजाब राज्यातील हेरॉईन (अंमली पदार्थ) तस्करीच्या गंभीर गुन्ह्यातील एका मुख्य फरार आरोपीला नांदेड येथून अटक केली आहे. दोन्ही राज्यांच्या पोलीस दलात असलेल्या उत्तम समन्वयामुळे ही धडक कारवाई अत्यंत वेगाने आणि यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
दिनांक ०४ जुलै २०२६ रोजी नांदेड येथील गुरुद्वारा परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असताना पोलिसांच्या निदर्शनास आली. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव जुगराज सिंग उर्फ गोलू किक्करसिंह ढिल्लो (वय २४ वर्षे, रा. लहिया, जि. तरनतारण, पंजाब) असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांमार्फत या इसमाची सखोल पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान सदर आरोपी हा पंजाबमधील अमृतसर येथील ‘अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ (ANTF) कडे नोंद असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ९८/२०२६ मधील पाहिजे असलेला मुख्य फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा निश्चित झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी त्याला नियमानुसार तातडीने अटक केली.
ही यशस्वी कामगिरी नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि विठ्ठल घोगरे, पोउपनि हरजिंदरसिंघ चावला, पोउपनि तुकडे, पोउपनि कोरे तसेच पोलीस अंमलदार गुरुदिपसिंघ कार्ला, राजु बोधगीरे, साहेबराव शिंदे, गोविंद राठोड, गणेश यादव, संजय राठोड आणि विश्वनाथ पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अटक केलेल्या आरोपीचा ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेऊन त्यास पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.






