नांदेड – जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार, नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मारोती श्रीराम मुंडे यांची नियुक्ती आता शहर वाहतूक शाखा, वजिराबाद येथे करण्यात आली आहे. तसेच, वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर बंकटराव कदम यांची हदगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित पोपट कुंभार यांची वजिराबाद येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच शहर वाहतूक शाखा वजिराबाद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत टिकाराम नागरगोजे यांची सोनखेड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, भोकर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंभार यांची बदली झाल्यामुळे, तेथील रिक्त पदाचा तात्पुरता अतिरिक्त प्रभार सपोनि शैलेंद्र आवटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आदेशात नमूद केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने आपापल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून तसा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.






