Nanded Vruttavedh
एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Nanded Vruttavedh
नांदेड – येथील बंद पडलेली एन. टी. सी. उस्मानशाही मिल पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी ‘उस्मानशाही मिल हक्क संवर्धन समिती’च्या वतीने निवासी जिल्हाधिकारी मा. किरण अंबेकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधून मिल सुरू करण्यासाठी तातडीने योग्य पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी समितीच्या संयोजक तरण्णूम बेगम मोहमद यांच्यासह श्याम निलंगेकर, यशवंत थोरात, काकासाहेब डावरे, मंजू आडणे, वैशाली कऱ्हाळे आणि रुक्सना शेख सलमान आदी पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. या आंदोलकांनी उस्मानशाही मिलशी जोडलेल्या कामगारांच्या रोजगाराचा आणि स्थानिक विकासाचा प्रश्न यावेळी प्रशासनासमोर मांडला.
उस्मानशाही मिल बंद पडल्यामुळे शेकडो कामगारांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून, ही मिल पुन्हा सुरू झाल्यास स्थानिकांच्या हाताला मोठा रोजगार उपलब्ध होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारून संबंधित वरिष्ठांपर्यंत ही मागणी पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे.





