नांदेड : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. नांदेडमधून भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपने एकूण १० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने ही अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत प्रामुख्याने वर्धा-चंद्रपुर-गडचिरोली, अमरावती, सोलापूर आणि जळगावसह इतर महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.
या जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी भाजपने अपेक्षेप्रमाणे अमरनाथ राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी बहाल केली आहे. नांदेडसह मराठवाड्यातील धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातून बसवराज पाटील तर छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. याशिवाय नागपूरच्या पोटनिवडणुकीसाठी डॉ. राजीव पोतदार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.






