नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली. भाऊराव चव्हाण कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दशरथ कपाटे यांच्या शेताजवळ काही तरुण अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शासकीय पंच आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सापळा रचून धाड टाकली. यावेळी एका स्विफ्ट डिझायर कारची (क्र. MH 24 AF 1807) झडती घेतली असता, त्यामध्ये ४ किलो ५१० ग्रॅम गांजा आढळला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २ लाख २५ हजार ५०० रुपये असून, ४ लाख ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण ६ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शेख अरबाज शेख बाबु (वय २२, रा. रशिद टेकडी, भोकर) याला ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार शेख फयुम शेख मुफ्तु (रा. सईदनगर, भोकर) हा फरार झाला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.





