नांदेड जिल्ह्यात दोन दिवस ‘येलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता
नांदेड : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २० आणि २१ एप्रिल २०२६ या दोन दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी केले आहे.
आज, २० एप्रिल रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अचानक होणाऱ्या या हवामान बदलामुळे शेतीमालाचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उद्या, २१ एप्रिल रोजी देखील जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादिवशी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.





