नांदेड जिल्ह्यात पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाचे छापे; बनावट जर्दा कारखान्यासह जुगार अड्ड्याचा पर्दाफाश
नांदेड:
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत उमाप यांच्या विशेष पथकाने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि देगलूर भागात धडक कारवाया केल्या. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी बनावट सुगंधित जर्दा बनवणारा कारखाना आणि एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण ७ लाख ३७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर भागात सय्यद जाकीर ऊर्फ बाबा गुलाम दस्तगीर (वय ४० वर्षे) हा इसम बनावट सुगंधित जर्दा तयार करत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने आज, १३ एप्रिल २०२६ रोजी आरोपीच्या घरावर छापा टाकला. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणावर बनावट जर्दा तयार करण्याचे साहित्य आढळून आले.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सय्यद जाकीर हा हलक्या प्रतीच्या जर्द्यामध्ये ग्लिसरीन आणि पॅराफीन मिसळून त्याला नामांकित कंपन्यांच्या सुगंधित जर्द्याचे स्वरूप देत असे. त्यानंतर मशीनच्या साहाय्याने पॅकिंग करून हा बनावट माल बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जात होता. पोलिसांनी या ठिकाणाहून सुगंधित जर्दा, पॅकिंग मशीन, ग्लिसरीन आणि पॅराफीन असा एकूण ३ लाख ४४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपी सय्यद जाकीरला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ अन्वये गुन्हा (गुरनं १९६/२०२६) नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष काळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दुसरी मोठी कारवाई देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुषावाडी शिवार येथे करण्यात आली. दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी रंजित इंगोले यांच्या शेतातील आखाड्यावर छापा टाकला असता, तिथे ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळणारे ८ जण रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून ३६ हजार ३४० रुपयांची रोकड, ८ मोबाईल आणि ७ मोटार सायकली असा एकूण ३ लाख ९३ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक महाजन मैसनवाड पुढील तपास करत आहेत.
या दोन्ही कारवाया पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केल्या, ज्यामध्ये प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांचा समावेश होता. या पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
परिक्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती भीती न बाळगता ९१ ५० १०० १०० या ‘खबर’ हेल्पलाइन क्रमांकावर गोपनीयपणे द्यावी, असे आवाहन श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले.





