
नांदेड जिल्हयात महिला व बालकांसाठी सक्षम अंगणवाड्यांचे जाळे; लेक लाडकी योजनेतून सशक्त आधार
नांदेड – महिला सक्षमीकरण व बालकांचे सुरक्षित, निरोगी भविष्य या दृष्टीने जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 80 अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली आहे.
प्रत्येक तालुक्यातून पाच अशा निवडलेल्या अंगणवाड्यांतून केवळ पोषणपुरवठा न करता, शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्य, शिक्षण व मानसिक विकासावर भर दिला जाणार आहे. याशिवाय गर्भवती महिला, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन व सेवा पुरवण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, पिवळ्या किंवा केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाख 1 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. योजनेतील टप्प्यावार दिले जाणारे अर्थसहाय्य पुढीलप्रमाणे जन्मावेळी 5 हजार रुपये, इयत्ता 1 ली प्रवेशावेळी 6 हजार, इयत्ता 6 वी प्रवेशावेळी 7 हजार, इयत्ता 11 वी प्रवेशावेळी 8 हजार तर 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपयाचे अर्थ सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे मुलींच्या शिक्षणाला चालना, बालविवाहास प्रतिबंध, व बालमृत्यू दरात घट घडवून आणणे होय.
या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण घटले, बालविवाहाचे प्रमाण कमी झाले असून महिलांच्या सक्षमीकरणाला नवे बळ मिळाले आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
समाजाचा पाया मजबूत करायचा असेल तर स्त्री व बालकांना सक्षम करणे अत्यावश्यक आहे, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी व्यक्त केले. या योजनांचा लाभ घेण्यासाठी किशोरवयीन मुली व महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी केले.