
विष्णुपूरी प्रकल्पात पाणी पातळीत वाढ, २३.२२% पाणीसाठा उपलब्ध
नांदेड – गेल्या सहा जून पासून विष्णुपुरी प्रकल्पाच्या क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पाची पाणी पातळी आज सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार ३४९.५० मीटर नोंदवली गेली आहे. प्रकल्पातील एकूण साठवण क्षमतेच्या २३.२२% पाणीसाठा सध्या उपलब्ध झाले आहे, ज्यामुळे प्रकल्पात पाण्याची समाधानकारक स्थिती दिसून येत आहे. अवकाळी पाऊस आणि त्यानंतर लगेच मान्सून देखील वेळेच्या आतच दाखल झाल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नांदेड शहराचे भविष्यातील पाणी संकट दूर झाले आहे.
विष्णुपुरी धरणात पाणी येणे सुरू झाल्याने एकूण जलसाठ्यात आज सकाळपर्यंत ३.२२% वाढ झाली आहे, जी प्रकल्पासाठी आणि परिसरासाठी दिलासादायक बाब आहे. मान्सूनच्या आगमनानंतर पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
सद्यस्थितीत प्रकल्पात १८.७६ दशलक्ष घनमीटर (Mm3) प्रत्यक्ष पाणीसाठा (Live storage) असून, एकूण पाणीसाठा २१.५२ दशलक्ष घनमीटर (Mm3) इतका आहे.
गेल्या २४ तासांत प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळी ७ वाजेपर्यंत २ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, यावर्षी आत्तापर्यंत एकूण २४ मि.मी. पाऊस झाला आहे.
प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली असून, आज २.५६ दशलक्ष घनमीटर (Mm3) पाण्याची आवक नोंदवली गेली आहे. ही एकूण आवक देखील २.५६ दशलक्ष घनमीटर (Mm3) इतकीच आहे. विशेष म्हणजे, सध्या प्रकल्पातून कोणताही विसर्ग (Outflow) केला जात नाहीये. सांडव्यावरून (Spillway) पाण्याचा विसर्गच नसल्याने सध्या गेट्स उघडण्याची आवश्यकता नाही. प्रकल्पाचे एकही गेट सध्या उघडलेले नाही.
पाण्याची एकूण उंची ९.०० मीटर असून, आजच्या पाण्याची उंची ३.५० मीटर नोंदवली गेली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.