Nanded Vruttavedh
नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन
नांदेड – नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे तिथले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या विविध देशांतील व राज्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
या गंभीर परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील जे नागरिक किंवा पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले आहेत, किंवा ज्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकत नाही, त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
पर्यटकांच्या मदतीसाठी आणि माहिती संकलनासाठी ‘जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड’ येथे विशेष संपर्क व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२३५०७७ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
प्रशासनाला माहिती देताना पर्यटकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेलचा पत्ता, प्रवासाचा तपशील आणि त्यांच्या कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक यांसारखी महत्त्वाची माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून समन्वय साधणे सोपे होईल.
नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आपत्तीग्रस्त भागातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी व त्यांना आवश्यक ती सर्व मदत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे तत्पर असून, वरिष्ठ पातळीवर आवश्यक तो समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.





