
विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे
-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड – राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जेईइ , नीट, एमएचसीईटी, एनडीए तसेच अन्य महत्त्वाच्या शैक्षणिक व प्रवेश परीक्षांमध्ये सहभागासाठी विद्यार्थ्यांना आधार आधारित ओटीपी अथवा प्रमाणीकरण आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांची आधार माहिती बायोमेट्रीकदृष्ट्या अद्ययावत नसल्यामुळे अशा परीक्षांमध्ये नोंदणी करताना अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
दहावी, बारावी पर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करणे ही काळाची गरज आहे. आधार बायोमेट्रीक अपडेट अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक आहे.
सर्व शाळा व महाविद्यालयांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांची आधार स्थिती तपासावी आणि ज्यांचे आधार बायोमेट्रिक अद्ययावत नाही त्यांना लवकरात लवकर जवळच्या आधार केंद्रावर करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. त्याअनुषंगाने १२ जून 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र चालक यांची बैठक घेऊन सर्व विदयार्थ्यांचे आधार कार्ड प्राधान्याने अपडेट करण्याचे निर्देश दिले.
प्रमुख सूचना:
विद्यार्थ्यांनी युआयडीआय या अधिकृत वेबसाइटवर आधार स्थिती तपासावी.
शाळांनी वर्गनिहाय यादी तयार करून विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार आधार केंद्रावर जाण्यास मदत करावी. आधार बायोमेट्रिक अपडेट साठी विद्यार्थ्यांनी जवळच्या आधार नोंदणी केंद्रात उपस्थित राहावे.
जिल्ह्यातील सर्व आधार नोंदणी केंद्रांनी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने सेवा द्यावी.
बायोमेट्रिक अद्ययावत का आवश्यक आहे?
वय 5 व 15 पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट बंधनकारक असते. कारण या वयात शरीरातील बायोमेट्रिक बदलतात. आपल्या आधारची बायोमेट्रिक माहिती जुनी असेल तर आधार बेसड ईकेवायसी करतांना अडचण येऊ शकते. ज्यांच्याकडे मोबाइल क्रमांक लिंक नाही किंवा बायोमेट्रिक त्रुटी आहेत, त्यांनी तातडीने आधार अपडेट करून शैक्षणिक संधींचा लाभ घेण्याची दक्षता घ्यावी.
युआयडीआयच्या धोरणानुसार, नियमित अद्ययावत न केल्यास सेवा घेण्यामध्ये अडचण येउ शकते.
आधार बायोमेट्रिकचे महत्त्व:
शैक्षणिक प्रवेश व परीक्षा:
जेईइ, नीट, एमएचटी यांसारख्या परीक्षांमध्ये ऑनलाइन अर्ज करताना आधार ओटीपी व प्रमाणीकरण आवश्यक असते.
शिष्यवृत्ती आणि सरकारी योजना:
विद्यार्थ्यांना डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकृत असणे आवश्यक आहे.
बँकिंग व आर्थिक व्यवहार:
आधार-आधारित केवायसीसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य आहे.
रोजगार योजनांमध्ये नोंदणी:
पीएमकेव्हीवाय, एनसीएस, मनरेगा इत्यादी योजनांमध्ये सहभागासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असते.
आरोग्य सुविधा (आयुष्यमान भारत योजनेसाठी):
रुग्णांची ओळख बायोमेट्रिकवर आधारित असल्याने योग्य अद्ययावत असणे गरजेचे.