नांदेड शहरात अनधिकृत होर्डिंगप्रकरणी हॉटेल मालकासह जाहिरातदारावर गुन्हा दाखल
नांदेड – शहरातील शिवाजी नगर भागात महानगरपालिकेने अनधिकृत जाहिरात होर्डिंग्जविरोधात धडक कारवाई केली आहे. ‘द टेबल फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’चे चालक व मालक, तसेच बॅनर तयार करणारे आणि ते लावणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात विनापरवानगी फलक लावून विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवत मनपा प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने शहरात जाहिरात फलकांसाठी एकूण ११८ ठिकाणे निश्चित केली असून, तिथे ठराविक आकाराच्या फ्रेमही बसवल्या आहेत. निर्धारित शुल्क भरून या ठिकाणी कायदेशीररीत्या तात्पुरती जाहिरात लावण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, संबंधित हॉटेल चालकांनी नियमांचे उल्लंघन करून विनापरवानगी फलक लावल्याचे २२ डिसेंबर रोजी निदर्शनास आले. यामुळे ‘महाराष्ट्र विद्रुपन प्रतिबंधक कायदा १९९५’ च्या कलम ३ नुसार पोलीस ठाण्यात FIR (क्र. ०४४९/२०२५) नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त अजितपालसिंघ संधु यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी रमेश चवरे, इमारत निरीक्षक भरत शिवपुरे व अतिक्रमण पथकाने ही मोहीम राबवली. आचारसंहिता काळात नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी अनधिकृत फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






