वडेपुरी शिवारात माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन; व्यापारी अतुल सेन यांनी काढले व्हिडिओ, परिसरात दवंडी
सोनखेड/वडेपुरी :
लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडेपुरी शिवारात आज सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वडेपुरी शिवारातील माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी पर्ण हॉटेलजवळ हा बिबट्या दिसून आला असून, व्यापारी अतुल सेन नामक व्यक्तीने सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलमध्ये या बिबट्याचे दोन व्हिडिओ चित्रित केले आहेत.
बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वन विभाग आणि सोनखेड पोलिसांनी तातडीने कार्यवाही केली. परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन वन विभाग तसेच आसपासच्या सर्व गावातील पोलीस पाटील यांना तत्काळ सूचना देण्यात आल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गावांमध्ये दवंडी देऊन ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे अद्याप पावेतो कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
वन विभागाने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी शेतात किंवा घराबाहेर एकटे न फिरण्याचे आणि पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.





