हिंगोली आणि नांदेडमध्ये विशेष पथकाचे छापे; ७३ लाखांच्या गुटख्यासह १ कोटींचा मुद्देमाल जप्त
नांदेड: परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने हिंगोली आणि नांदेड शहरात मोठी कारवाई केली आहे. अवैध व्यवसायांविरुद्ध पुकारलेल्या या मोहिमेत ७२ लाख ९३ हजार रुपयांचा गुटखा आणि वाहने असा एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पहिली कारवाई आज पहाटे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तलेदवार यांच्या नेतृत्वातील पथकाने तीन चारचाकी वाहनांना अडवून त्यांची झडती घेतली. यामध्ये १४ लाख ६७ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळला. याप्रकरणी करण सदाशिव अवचार आणि प्रभाकर दिगंबर अवचार (दोघे रा. भोसी, ता. कळमनुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १० लाख रुपये किमतीची तीन वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
हिंगोलीतील कारवाईनंतर या पथकाने आपला मोर्चा नांदेड शहराकडे वळवला. शहरातील इतवारा भागात असलेल्या एका गुप्त गोदामावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५८ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच गुटख्याचा पुरवठा करणारा २० लाख ५० हजार रुपयांचा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी शेख जिबरान शेख मुखीद आणि गणेश रामराव कऱ्हाळे या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून, इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या यशस्वी मोहिमेत सपोनि दशरथ तलेदवार यांच्यासह प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी या अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. पोलीस दलाची प्रतिमा उंचावणारी ही कामगिरी केल्याबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी संपूर्ण पथकाला १५,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचे मोठे ‘रॅकेट’ किंवा पाठबळ आहे का, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन श्री. उमाप यांनी केले आहे. कोणत्याही अवैध व्यवसायाची माहिती असल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा ‘खबर’ हेल्पलाइन क्रमांक 91 50 100 100 वर संपर्क साधावा. तसेच nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरही माहिती देता येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.






