विष्णुपुरी व लिंबोटी जलाशयातील अनधिकृत पाणी उपशावर रोख; जिल्हाधिकाऱ्यांचे चार विशेष पथके तैनात
- Nanded Vruttavedh
नांदेड – जिल्ह्यातील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी व ऊर्ध्व मानार मध्यम प्रकल्प लिंबोटी जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, या आरक्षित जलसाठ्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कठोर पावले उचलली आहेत.
संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता नांदेड शहर व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार १ ऑक्टोबर २०२६ पासून अनधिकृत पाणी उपशावर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी चार विशेष दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
स्थापन करण्यात आलेल्या दक्षता पथकांना जलाशयाच्या काठावरील अनधिकृत विद्युत मोटारी बंद ठेवण्याची व २४ तास गस्त घालून पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही पथके randomly (यादृच्छिकपणे) विविध ठिकाणी तपासणी करून अनधिकृत उपशावर बारीक लक्ष ठेवणार आहेत.
ज्या ठिकाणी अनधिकृत पाणी उपसा किंवा बेकायदेशीर वीज जोडणी आढळून येईल, तेथे महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ व केंद्रीय विद्युत कायदा २००३ नुसार कडक कारवाई केली जाईल. यामध्ये पंप संच जप्त करणे, दंड आकारणे, वीज जोडणी तोडणे आणि फौजदारी गुन्हे दाखल करणे यांसारख्या कारवायांचा समावेश आहे.
पहिले पथक विष्णुपुरी जलाशयाच्या उजव्या बाजूकडील असर्जन ते वाहेगाव या भागावर लक्ष ठेवेल. यामध्ये असर्जन, विष्णुपुरी, पिंपळगाव मार्कड, खरबी, कल्हाळ, दगडगाव, बामणी, पांगरी, शेवडी व वाहेगाव या गावांचा समावेश आहे.
दूसरे पथक विष्णुपुरी उजव्या बाजूच्या गंगाबेट ते अंतेश्वर दरम्यान गस्त घालेल. यात गंगाबेट, भनगी, जवळा, पळशी, बेटसांगावी, पेनूर, भेंडेगाव, पेनूरवाडी, शिवणी, बोरगाव, भारस्वाडा व अंतेश्वर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
तिसरे पथक विष्णुपुरी डाव्या बाजूच्या कोटीतीर्थ ते कवलगाववाडी परिसरावर लक्ष ठेवेल. या पथकाच्या कार्यक्षेत्रात कोटीतीर्थ, सुगाव, थुगाव, बोरगाव ते, वाघी, सोमेश्वर, जैतापूर, रहाटी, पिंपळगाव को. व कवलगाववाडी या गावांचा समावेश आहे.
चौथे पथक लिंबोटी जलाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूकडील गावांमध्ये कारवाई करेल. यामध्ये लिंबोटी, गौंडगाव, आंडगा, माळेगाव, रुई, सांगवी, गंगाहिप्परगा, ढोलदरी तांडा, घोटका, मांगदरी, सिंदगी, वरवंटी, सुनेगाव, रुद्धा आणि हागदळ या गावांचा समावेश आहे.
या सर्व दक्षता पथकांमध्ये पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, महावितरण आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. गस्त घालणाऱ्या या पथकांना सशस्त्र पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.






