नांदेड जिल्ह्यासाठी १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, आपत्ती व्यवस्थापनाचे सतर्कतेचे आवाहन
Nanded Vruttavedh
नांदेड – यंदा मान्सून आला तसा परत गेला. राज्यभरासह नांदेड जिल्ह्यातही पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरिपांच्या पिकांची तसंच बागायती पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाट पाहण्यातच यंदाचा पावसाळा निघून गेला. शिल्लक राहिल्या त्या शेत जमिनीच्या भेगा, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, जनावरांसाठी भविष्यात चारा पाणी व आर्थिक तंगी. या कोरड्या दुष्काळाचा फटका केवळ ग्रामीण भागाला नाही तर शहरी भागाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे. आता मान्सून पुढच्या वर्षीच येणार. वेळेवर येणार की उशिरा येणार. तोपर्यंत कसे व्हायचे? या प्रश्नानं सामान्य नागरिक शेतकरी आणि सरकारलाही विवंचनेत टाकले आहे.
अशातच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त करीत, नांदेड जिल्ह्यासाठी येत्या १७ व १८ ऑक्टोबर रोजी चक्क दोन दिवसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत होताना दिसत आहेत. कारण मान्सून गेल्यानंतरही जर अशा पद्धतीने अवकाळी पाऊस पडू लागला तरी त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे व जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न मिटणार आहेत, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘यलो’ (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबतची प्रेस नोट प्रसिद्ध केली असून नागरिकांना तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या दोन दिवसांत जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. संभाव्य नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयातून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विजा चमकत असताना आणि वादळी पाऊस सुरू असताना नागरिकांनी काय करावे, याविषयी प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. विजांचा गडगडाट होत असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा किंवा सखल भागात सुरक्षित बसावे. तसेच घरात असताना विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावीत आणि तारेचे कुंपण, विजेचे खांब व पाण्यापासून दूर राहावे.
नागरिकांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. विजा चमकत असताना लँडलाईन फोन, शावरखाली आंघोळ करणे किंवा पाण्याचे नळ व पाईपलाईनला स्पर्श करणे टाळावे. याशिवाय उंच झाडांखाली, धातूंच्या उंच मनोऱ्यांजवळ किंवा लोखंडी शेड व तंबूंमध्ये आश्रय घेऊ नये, कारण हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
नांदेडचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुन्हे यांनी स्वाक्षरी केलेल्या या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व नागरिकांनी हवामानाच्या या बदलादरम्यान सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.





