नांदेड शहरात ब्राऊन शुगरची विक्री
श्रीनगर, विवेकनगरातून दोघे अटकेत
३ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नांदेड – शहरात छुप्या मार्गाने अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ६२ ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर (चिट्टा) जप्त करण्यात आली असून, या अंमली पदार्थाची किंमत ३ लाख १० हजार रुपये आहे. ही कारवाई श्रीनगर येथील विवेकनगर परिसरात आशीष किराणा दुकानाजवळ करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांना १८ ऑक्टोबर रोजी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर, विवेकनगर परिसरात २ व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या ब्राऊन शुगर विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली छाप्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर वैधमापनशास्त्र विभागाचे राजपत्रित अधिकारी आणि पोलीस पथकाच्या उपस्थितीत दुपारी संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला.
यावेळी मिळालेल्या माहितीतील वर्णनाशी जुळणाऱ्या २ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे गुरबीरसिंग हरपालसिंग संधू ( मूळ रा. तरणतारण, पंजाब; सध्या रा. श्रीनगर) आणि जनार्दन गोविंदराव सोनटक्के ( रा. ब्राह्मणवाडा, ता. नांदेड) अशी आहेत. दोघांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या खिशातून एकूण ६२ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आढळून आला. घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेच्या सहायक रासायनिक विश्लेषकांकडून तपासणी करून हा पदार्थ ब्राऊन शुगर असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा अंमली पदार्थ पंजाब येथील निक्का आणि बंटी ( राज्य पंजाब ) या दोन व्यक्तींकडून विकत आणल्याचे सांगितले . या माहितीच्या आधारे अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे तसेच पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, गुंडेराव करले, रितेश कुलथे, दिलीपकुमार चंचलवार, उमर शेख, सुनील गटलेवार, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे आणि नरेंद्र राठोड यांनी सहभाग घेतला. वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक आनंद सावते तसेच फॉरेन्सिक विभागाचे राजेश पांचाळ आणि वेदांत नगनुरवार यांनीही कारवाईत सहकार्य केले.





