गाडीपुरा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल
इतवारा गुन्हे शोध पथकाची कारवाई
नांदेड – जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत इतवारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गाडीपुरा भागात मोठी कारवाई केली आहे.
इतवारा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, गाडीपुरा येथील हनीसिंग चौधरी यांच्या घरात बेकायदेशीररीत्या ‘तिर्रट’ नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसह घटनास्थळी तात्काळ छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ८ आरोपींना ताब्यात घेतले, तर घरमालक हनीसिंग चौधरी हा फरार झाला आहे.
या कारवाईत पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल फोन, २३ हजार ३३० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ७३ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी भिमराव धमने, माधव आरसुलवाड, कलीम खान, मोहम्मद सुभान, राजू भोसले, विक्की सोनकांबळे, सय्यद अलीओद्दीन, मोहम्मद सिराज आणि हनीसिंग चौधरी या ९ जणांवर इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१६/२०२६ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड तसेच पोलीस अंमलदार कलंदर, राठोड, कदम, सुखई, कोरनुळे, गिते आणि बेग (सर्व नेमणूक इतवारा पोलीस ठाणे) या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
नांदेड जिल्हा पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्ध ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






