३१ डिसेंबर व नववर्ष स्वागतासाठी नांदेड पोलीस सज्ज; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
नांदेड- ३१ डिसेंबर आणि नववर्ष स्वागताचा उत्साह सर्वत्र दिसून येत असताना, नांदेड शहर आणि जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. सध्या नांदेड शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर, नववर्षाचा आनंद साजरा करताना जनतेने आचारसंहितेचे आणि जमावबंदीच्या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला नांदेड शहर व ग्रामीण भागात व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जाणार असून, ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ रोखण्यासाठी ‘ब्रिथ अनालायझर’द्वारे तपासणी केली जाईल. शहरातील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) आणि हॅन्ड सेल्फ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. रस्त्यावर हुल्लडबाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, केक कापून गोंधळ घालणे, बुलेटचा आवाज काढणे किंवा दारू पिऊन वाहन चालवणे अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलीस कठोर कायदेशीर कारवाई करणार आहेत.
या विशेष बंदोबस्तासाठी नांदेड पोलीस दलाचे मोठे संख्याबळ रस्त्यावर उतरणार आहे. यामध्ये १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, ९ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४० पोलीस निरीक्षक, १७० पोलीस अधिकारी आणि १२०० पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. तसेच १२ दंगा नियंत्रण पथके, २० स्ट्रायकिंग फोर्स आणि १३०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये आणि काही तक्रार असल्यास तात्काळ ‘डायल ११२’ किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिले आहेत.





