राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल
नांदेड -महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यात नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचाही समावेश आहे. या घोषणेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीची प्रक्रिया आणि पुढील कार्यवाही आजपासून (१५ डिसेंबर) लागू झालेल्या आचारसंहितेच्या कडक नियमांनुसार पार पडणार आहे.
घोषित कार्यक्रमानुसार, निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत आपले नामनिर्देशन (उमेदवारी अर्ज) दाखल करता येणार आहे. दाखल केलेल्या अर्जांची छाननी (पडताळणी) ३१ डिसेंबर रोजी होईल. छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारी पर्यंत ठेवण्यात आली आहे. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३ जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल आणि त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाईल.
या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सर्व महानगरपालिकांमधील मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल. या कार्यक्रमाने महानगरपालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून, सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.





