नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचे थैमान; वृद्ध दांपत्यासह ४ जणांचा मृत्यू; अनेक गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये शिरले पाणी
नांदेड -जिल्ह्यामध्ये १५ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, घरांची पडझड झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक पाळीव प्राणीही वाहून गेले आहेत.
जिल्ह्यातील मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, मुदखेड, उमरी, नायगाव या नऊ तालुक्यांतील २७ मंडळांमध्ये १५ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये कंधार तालुक्यातील फुलवळ मंडळात सर्वाधिक १३३.२५ मिमी पावसाची नोंद झाली. तर, १६ ऑगस्ट रोजी कंधार, लोहा, देगलूर व हिमायतनगर या चार तालुक्यांतील चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. लोहा तालुक्यातील शेवडी मंडळात सर्वाधिक १०३.७५ मिमी पावसाची नोंद झाली.
मानवी आणि पशुधनाचे नुकसान
१६ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे पावसामुळे घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात शेख नासर शेख आमीन (वय ७२) आणि शेख हसीना बेगम शेख नासर (वय ६८) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, किनवट तालुक्यातील सिंदगी (चिखली) येथे प्रेमसिंग मोहन पवार (वय ४२) हे स्कूल व्हॅन घेऊन जात असताना पुरात वाहून गेले आणि त्यांचा मृतदेह सापडला.
लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे अनिल मुरहरी नाईक यांचा बैल आणि वाळकी खुर्द येथील चंद्रकांत संभाजी गायकवाड यांची म्हैस पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर, तळेगाव येथील शेतकरी सतीश शिवाजीराव देशमुख यांची म्हैस वीज कोसळून मयत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये पाणी शिरले
अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. किनवट-उमरखेड दरम्यानच्या पैनगंगा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबली आहे. तसेच, हिमायतनगरमधील शिरंजनी-सिलोडा शिरपली आणि कामारी-पिंपरी रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. देगलूर तालुक्यातील तूप शेळगाव आणि लख्खा गावांचाही संपर्क तुटला आहे.
उमरी तालुक्यातील मोखंडी, वाघाळा, कोलारी आणि जवरला या गावांमध्ये नाल्याला पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरले आहे. हिमायतनगरच्या बोरगडी गावात २० घरांमध्ये पाणी शिरले आहे. माहूर तालुक्यातील रामूनाईक तांडा येथेही चार घरांमध्ये पाणी घुसून जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील सायळवाडी मोठा तांडा आणि छोटा तांडा येथील नाल्यावरील पूल तुटल्यामुळे दोन-तीन गावांचा संपर्क तुटला आहे.
प्रशासनाकडून मदतकार्य सुरू
या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. किनवट येथे गोशाळेत पाणी शिरल्यामुळे पशुसंवर्धन विभागाने जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच, सर्व नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. किनवट येथील व्हॅन चालकाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे.






