हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता
नांदेड जिल्ह्यात 8 ते 15 ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची माहिती
नांदेड – देशभरात दिनांक 8 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा– हर घर स्वच्छता ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातही या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा उत्सव स्वच्छतेच्या संकल्पाने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली आहे.
या मोहीमेचा दिनांक 8 ऑगस्ट रोजी शुभारंभ होणार असून, यावेळी गावागावात स्वच्छ सुजल गाव ही प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. दिनांक 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. प्लास्टिकमुक्ती, नाल्यांची स्वच्छता, पाणी गळती थांबवणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, जलकुंभ स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि वॉश घटकांचे सुशोभीकरण, जलसंवर्धन, भूजल पुनर्भरण, शौचालय स्वच्छता, आणि गावातील रस्ते व ठिकाणांची सजावट केली जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी गावोगाव ध्वजारोहणासोबत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जाईल व अभियानात विशेष कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात येईल. ही मोहीम लोकसहभागावर आधारित असून, ग्रामपंचायती, महिला बचत गट, पाणी व स्वच्छता समित्या, शालेय विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून सर्व गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या मोहिमेत नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी व जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमित राठोड यांनी यांनी केले आहे.






