आंबेडकरनगर खून प्रकरणी मुख्य आरोपी निष्पन्न; ७ महिन्यांनंतर निकेत उर्फ श्याम धिरे जेरबंद
नांदेड – शहरातील आंबेडकरनगर येथे सात महिन्यांपूर्वी घडलेल्या दीपक पाईकराव खून प्रकरणातील मुख्य आरोपी निकेत ऊर्फ NDK श्याम धिरे (वय २३, रा. आंबेडकरनगर, नांदेड) याला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या कौशल्याने अटक केली आहे. १३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा झालेल्या या घटनेत दीपक पाईकराव यांचा निर्घृण खून करण्यात आला होता, तर त्यांचे मित्र धीरज प्रकाश सोनकांबळे गंभीर जखमी झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री अंदाजे ११.३० वाजताच्या सुमारास धीरज प्रकाश सोनकांबळे आणि दीपक पाईकराव हे दोघे मित्र पावडेवाडी नाक्याकडून आंबेडकरनगर पाठीमागे बिर्याणी खाण्यासाठी आले होते. त्यावेळी अनोळखी दोन ते चार इसमांनी त्यांना अडवून “तुम्ही कुठे जात आहात?” अशी विचारणा केली. कोणताही वाद नसताना, आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यात धीरज सोनकांबळे गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी दीपक पाईकराव यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडाने डोक्यावर मारहाण करून गटारात फेकून दिले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी धीरज सोनकांबळे तसेच गंभीर अवस्थेतील दीपक पाईकराव यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दीपक पाईकराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या सात महिन्यांपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. आज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड हे आपल्या पथकासह नांदेड आणि परभणी परिसरात आरोपींच्या शोधात गस्त घालत होते. लिंबगाव येथे असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आंबेडकरनगर खून प्रकरणातील आरोपी नांदेड-पूर्णा रस्त्यावरील नाळेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर थांबलेला आहे.
या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक संशयित आरोपी आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव निकेत ऊर्फ NDK श्याम धिरे (वय २३, रा. आंबेडकरनगर, नांदेड) असे सांगितले. त्याने सात महिन्यांपूर्वी दीपक पाईकराव यांचा खून केल्याची कबुली दिली.
निकेत धिरे याला ताब्यात घेतल्यानंतर, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अभिलेखांची पडताळणी करण्यात आली असता, त्याच्याविरुद्ध वर नमूद केलेला गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी यु. के. कदम हे करत आहेत.
या कामगिरीबद्दल नांदेडचे पोलीस अधीक्षक अबीनाशकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांचे कौतुक केले आहे.






