नांदेडच्या महसूल पथकाची मार्कंड घाटावर मोठी कारवाई; अवैध वाळू उपसा करणारे तराफे जाळले; 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड – तालुक्यातील मार्कंड घाटावर गोदावरी नदी पात्रात अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात होता. याची कुणकुण लागताच 2 जून रोजी पहाटे पाच वाजता मार्कंड परिसरात गोदावरी नदीपात्रातून ग्रस्त सुरू केली. यावेळी वाळू उपसा करणारे 2 इंजिन व 8 तराफे आढळून आले. यापैकी काही तराफे पथकाने जाळून नष्ट केले तर काही तराफे आणि इंजिन जप्त करण्यात आले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय नांदेडच्या महसूल पथकाने नायब तहसीलदार स्वप्निल वामनराव दिगलवार, ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी, मनोज सरपे, दिलीप पवार, माधव पाटील, गोपीनाथ कल्याणकर, मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे तसेच महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत 11 लाख रुपयाचे इंजिन व तराफे जप्त करण्यात आले आहेत. सदर कारवाईच्या वेळी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गवळी हे उपस्थित होते. दरम्यान अवैध वाळू उपसा करणाऱ्या इंजिन मालकांबाबत माहिती मिळू शकली नाही. मालकाचा शोध लागताच याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.






