तणावमुक्त जीवनासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे – अशोक देशमुख
नांदेड – वाढता तणाव सहज, सोप्या पद्धतीने कमी करून आनंदी व संतुलित जीवन जगता येते, त्यासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन तणाव व्यवस्थापन तज्ज्ञ अशोक देशमुख यांनी केले. ते नांदेड येथील आयआयबी इन्स्टिट्यूट येथे डॉ. बबन जोगदंड व मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तणाव व्यवस्थापनावरील व्याख्यानात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेड होते. यशदाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. बबन जोगदंड, आयआयबी इन्स्टिट्यूटचे संचालक दशरथ पाटील यांची उपस्थिती यावेळी होती.
पुढे ते म्हणाले, आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत आहेत. अनेकजण नैराश्यात जाऊन आत्मघातकी विचार करतात. मात्र योग्य संवाद, कुटुंबासोबत वेळ घालवणे, योगसाधना व चिंतन यांच्या मदतीने तणाव कमी करता येतो. त्यांनी एकत्रित सहभोजन, सकारात्मक संवाद व नियमित व्यायाम यांचे महत्त्व अधोरेखित केले.
नांदेडमध्ये प्रथमच हसत-खेळत तणाव व्यवस्थापनाचे व्याख्यान झाल्याची विशेष नोंद घेण्यात आली. देशमुख यांनी उपस्थितांना सोप्या व प्रभावी तणावमुक्तीच्या टिप्स दिल्या. याप्रसंगी डॉ. गोविंद नांदेडे व डॉ. बबन जोगदंड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, डॉ. विजयकुमार माहुरे, गटशिक्षणाधिकारी किशन फोले, डॉ. विलास ढवळे, डॉ. राम वाघमारे, डॉ. देविदास तारू, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ. राम वाघमारे यांनी मानले






