पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद
नांदेड: शासकीय पोर्टलचा गैरवापर करून हजारो बनावट जन्म नोंदी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा उस्माननगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तपास पथकाने थेट झारखंड राज्यात जाऊन पाच आरोपींना अटक केली असून, त्यांना पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
सावळेश्वर (ता. कंधार) येथील ग्रामपंचायत अधिकारी भावना माधवराव कावळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. महाराष्ट्र शासनाच्या CRS (Civil Registration System) पोर्टलचा युजर आयडी (MH20362RE) फिर्यादीच्या ताब्यात असताना, अज्ञात व्यक्तींनी त्याचा बेकायदेशीर वापर केला. या आयडीद्वारे तब्बल १५ हजार ५६९ बनावट जन्म नोंदी करून शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली होती. हा प्रकार १ मे २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडला.
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलीस आणि सायबर सेल, नांदेड यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला. तपासाची चक्रे फिरवत पोलीस पथकाने झारखंड राज्यातील रांची आणि गढवा जिल्ह्यातून पाच जणांना ताब्यात घेतले. यात जितेंद्र कुमार सिंह (वय ५२ वर्षे) व्यवसाय- बिल्डर, रा. गढवा, ओम प्रकाश मिश्रा (३३) इंटरनेट सेंटर चालक, रा. रांची, लक्ष्मी पंडित (३४) खाजगी नोकरी, रा. रांची., सुमीत कुमार सिंह (२७) CSC सेंटर चालक, रा. रांची व सतिश कुमार (३५) CSC सेंटर चालक, रा. रांची, यांचा समावेश आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक एन. एस. आयलाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी व इतर अंमलदारांचा समावेश होता.
सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एन. एस. आयलाने करत आहेत.





