बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील आणि पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश
नांदेड: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील आणि पर्समधील दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली असून, आरोपींकडून ५ लाख ६८ हजार २९० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश कोरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. ८ जानेवारी रोजी गस्तीवर असताना, चोरीचे दागिने विकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित महिलांची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पुनम आतीष हातवळणे (२९), राखी हीरा हातवळणे (४०), शन्नु राजु हातवळणे (५०) आणि महेश दिनाजी गायकवाड (३८, तृतीय पंथी) या सर्व राहणार शांतीनगर, इतवारा, नांदेड यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने आढळले. अधिक चौकशीत या टोळीने मुखेड, हदगाव, कंधार, बिलोली, अर्धापूर आणि लोहा येथील बसस्थानकांवर बसमध्ये चढताना-उतरताना प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुखेड पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, पोलीस अधीक्षकांनी या यशस्वी कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.





