नांदेड येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींना ठोकल्या बेड्या; अवघ्या २४ तासात केले जेरबंद
नांदेड: येथील लंगर साहेब गुरुद्वारा (नगीना घाट) परिसरात शनिवारी संध्याकाळी दोन गटात झालेल्या वादातून गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परतेने चक्रे फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत दोन्ही गटांतील एकूण १० आरोपींना अटक केली आहे. भररस्त्यात झालेल्या या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेबाबत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गटातर्फे हॉटेल चालक कमलप्रितसिंग सिंधु यांनी फिर्याद दिली की, यात्रेकरूंसोबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेले असता एका ३० ते ३५ वर्षीय यात्रेकरूने त्यांच्यावर पिस्तूल झाडून जखमी केले. यावरून वजिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला. तर दुसऱ्या बाजूने पंजाबमधील रहिवासी लवप्रितसिंग चहल यांनी फिर्याद दिली की, जुन्या वादाचा राग मनात धरून स्थानिक काही व्यक्तींनी त्यांच्यावर तलवारी आणि काठ्यांनी हल्ला केला.
घटनेची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक, सुरज गुरव, (शहर) उप विभागीय पोलीस अधिकारी, रामेश्वर व्यंजने, स्थागुशाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, वजिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, परमेश्वर कदम व स्टॉफ घटेनच्या ठिकाणी तात्काळ रवाना झाले होते. सदर ठिकाणी जावून परिस्थीती तात्काळ नियंत्रणात आणली. त्यानंतर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पाच पथके तयार केली होती. सीसीटीव्ही फुटेज, सायबर सेलचे तांत्रिक विश्लेषण आणि नॅटग्रिड माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. यामध्ये अकोला, अर्धापूर, बीदर आणि पंजाबमध्ये पथके रवाना करण्यात आली होती. पोलीस पथकाने अकोला आणि बुलढाणा पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून मुख्य आरोपींसह सात जणांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्याचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील मिळून १० आरोपींवर अटकेची कारवाई सुरू केली आहे. यामध्ये गोळीबार करणाऱ्या सात यात्रेकरूंचा आणि दुसऱ्या गटातील तीन स्थानिक आरोपींचा समावेश आहे. अत्यंत संवेदनशील अशा या घटनेचा तपास कौशल्याने करून आरोपींना तातडीने जेरबंद केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे करत आहेत.





