शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड
लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक
लोहा – तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. 03 नोव्हेंबर रोजी अहिल्याबाई मसाजी ढगे या शेतात चक्कर येऊन पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलीस स्टेशन लोहा येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता. मात्र, तपास सुरू असताना शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून तक्रारदाराच्या जबाबावरून पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत, मयत महिलेचा नातेवाईक नामे गणेश नारायण ढगे (रा. ढगे पिंपळगाव) याच्याविरुद्ध दि. 09 नोव्हेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नौशाद पठाण यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे, सायबर शाखेच्या मदतीने आरोपी लोणीकंद, पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने हे पथक तात्काळ लोणीकंद येथे रवाना झाले.
पोलिसांचे तपास पथक पुणे येथे पोहोचले असता, आरोपी गणेश ढगे हा अरुणाचल प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला लोणीकंद येथून ताब्यात घेतले. आरोपीला पोलीस स्टेशन लोहा येथे आणून कसून चौकशी केली असता, त्याने शेतीच्या वादातून मयत अहिल्याबाईचा खून केल्याचे कबूल केले. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला पोलीस कोठडीत घेत अधिक तपास सुरू केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या तीन दिवसांच्या आत खुनाच्या आरोपीस अटक करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे. या जलद कारवाईमुळे लोहा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.





