शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
नांदेड – जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या छाताडावर बसून नांदेड जिल्हा प्रशासनाने एकीकडे मोठ्या दिमाखात दिवाळी पहाट कार्यक्रम सलग पाच दिवस घेतला. प्रशासनाला या शेतकऱ्यांची कीव आली नाही. त्यांचे दुःख समजले नाही. मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या संकटकाळात त्यांची साथ सोडली नाही. आर्थिक विवचनेत असलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या परिस्थितीचे भान ठेवत यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे संपूर्ण मराठवाड्यावर मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यात मे महिन्यापासून दर महिन्याला कधी अतिवृष्टी आणि पूर, तर कधी वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 28 ऑक्टोबर रोजी चव्हाण यांचा वाढदिवस आहे.
याविषयी समाजमाध्यमातून माहिती देताना खा. चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात वाढदिवस साजरा करणे उचित नसल्याने कोणीही केक, मिठाई, हार-तुरे किंवा पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये, अशी माझी नम्र विनंती आहे.”
खा. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, वाढदिवसाच्या दिवशी ते कुटुंबासह देवदर्शनाला जाणार आहेत. “सर्वांचा स्नेह, सदिच्छा आणि सहकार्य नेहमीच माझ्या पाठीशी राहिले आहे आणि भविष्यातही तसेच कायम राहील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांप्रति सहानुभूती दर्शवत आणि त्यांची संवेदनशीलता जपत खा. अशोकराव चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.





