पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने उजळली दिवाळी पहाटेची ‘संगीत अनुराधा’; बंदाघाटावर अविस्मरणीय सुरांचा महोत्सव
नांदेड – गायत्री मंत्र ते रुपेरी वाळूच्या माडाच्या बनात ये ना, धिरे धिरे से मेरी जिंदगी आना, जिये तो जिये कैसे, नजर के सामने, हर करम अपना करेंगे ये वतन तेरे लिये या व अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी आज प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांनी नांदेडच्या दिवाळी पहाटचा कार्यक्रम गाजवला. भल्या पहाटे प्रेक्षकांची अभूतपूर्व गर्दी हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये होते.
जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, सचखंड गुरुव्दारा बोर्ड आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या विद्यमाने गेल्या तेरा वर्षापासून गोदावरी तटावर बंदाघाट येथे या दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गोदावरीच्या तीरावरची ती मंद पहाट, वाऱ्याच्या सळसळीने आलेला गारवा, धुक्याच्या हलक्या लहरींनी सजलेला बंदाघाट परिसर आणि त्या वातावरणात घुमणारे सुमधुर स्वर! अशी दैवी अनुभूती देणारी ‘दिवाळी पहाटने’ यंदाही नांदेडकरांच्या मनात सुरांची सुवासिक फुले फुलवून गेली.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार हेमंत पाटील, आमदार आनंद पाटील तिडके बोंढारकर, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल व संयोजन समितीच्या सदस्यांनी केले.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन प्रभावी पद्धतीने केले, ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. तसेच, मनपाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यास सहकार्य केले आहे.
या सांगीतिक सोहळ्याची सुरुवात पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने होताच संपूर्ण परिसर पवित्रतेने भारून गेला. ‘संगीत अनुराधा’ या शीर्षकाखाली सादर झालेल्या त्यांच्या मैफिलीत भक्ती, प्रेम, देशभक्ती आणि लोकसंगीताचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.
प्रारंभीच्या सत्रात ‘मन मेरा मंदिर, शिव मेरी पूजा’, ‘ओ शेरावाली, तूने मुझे बुलाया शेरावालिये’ या आराधनात्मक गीतांनी वातावरण भक्तिभावाने ओथंबून गेले. त्यानंतर चांदणं चांदणं झाली रात, एकविरेची पहात होते वाट…’ या लोकगीताने रसिकांना महाराष्ट्राच्या मातीच्या सुगंधात रंगवले.
सुरांची लय पुढे प्रेमगीतांच्या तालावर झुलली. ‘रुपेरी वाळूत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना’ या गाण्याने तरुणाईला रोमँटिक अनुभूती दिली, तर ‘काळ्या मातीतं मातीतं, तिफनं चालते ’ आणि ‘हृदयी वसंत फुलताना’ ‘अश्विनी ये ना’ या हलक्याफुलक्या व युवा वर्गाला सर्वाधिक आवडणाऱ्या गीतांनी आनंदाची झुळूक निर्माण केली.
संगीताचा रंग गडद होत गेला तसा प्रेक्षकांचा उत्साहही वाढत गेला. ‘धीरे धीरे से मेरी ज़िंदगी में आना’, ‘अजीब दास्तॉं है ये, ‘दिल दिया है, जान भी देंगे’ या त्यांच्या लोकप्रिय हिंदी गीतांवर रसिकांच्या टाळ्यांचा गजर गोदावरीच्या लाटांवर मिसळला. तीन दशकांच्या त्यांच्या सुमधुर गायन प्रवासाचा सुवास या सुरावटींतून दरवळत राहिला.
मैफिलीची सांगता पौडवाल यांनी भक्तिभावाने ‘हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला…’ या गाण्याने केली. कार्यक्रमात सहगायक म्हणून रवींद्र अहिरे व रेषमा उपासे, तबला-ढोलकावर गौरव बोयाना, आदेश मोरे, संवादिनीवर आयुषी बोयाना, सिंथेसायझरवर किरण वेहेळेकर तर ऑक्टोपॅडवर राकेश पुलेकर यांनी अनुराधाजींच्या गायकीला मनभावी सुरसाथ दिली. यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा मनपा आयुक्त डॉ.महेश डोईफोडे व निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सत्कार केला.
संपूर्ण संकल्पना आणि निवेदन सुप्रसिद्ध लेखक डॉ. नंदू मुलमुले यांनी साकारले तर सूत्रसंचालन गजानन पिंपरखेडे यांनी उत्साही शैलीत केले. गतवर्षी अन्नपूर्णा मंदिर व चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख सुषमा गहेरवार यांनी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा कार्यक्रम होईल असे जाहीर केले आणि त्यांनी आपला शब्द पूर्ण केला.
गोदावरीच्या शांत पाण्यावर उमटलेले सूर, पहाटेच्या मंद प्रकाशात झळकणाऱ्या दिव्यांची लय आणि त्या लयीशी एकरूप झालेले रसिक नांदेडकर हीच खरी ‘नांदेडकरांची अविस्मरणीय दिवाळी पहाट ठरली.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, समितीचे अध्यक्ष प्रख्यात गझलकार बापू दासरी, समितीचे सदस्य सुरेश जोंधळे, शंतनू डोईफोडे, लक्ष्मण संगेवार, महेश होकर्णे, चारुदत्त चौधरी, उमाकांत जोशी, वसंत मैया, मकरंद दिवाकर, विजय जोशी, ॲड. गजानन पिंपरखेडे, हर्षद शहा, विजय बंडेवार आदी मंडळी या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
उद्या सकाळी प्रख्यात निवेदक प्रा.सुनिल नेरलकर यांची संकल्पना असलेला स्वर सरिता हा शास्त्रीय संगीतावर आधारीत कार्यक्रम होणार असून, पं.जसराज यांच्या शिष्योत्तमा प्रख्यात गायिका अंकिता जोशी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. तर २२ ऑक्टोबर रोजी पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेला व संकल्पना व निवेदन अॅरड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकारातून १९६० ते १९८० या वर्षातील मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ रुपेरी सोनसळा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे असून, प्रख्यात गायिका पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, सौ. कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे व विजय जोशी हे मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील दर्जेदार गीतांचे गायन सादर करणार आहेत. तर २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सतीश तांदळे यांच्या काफिला कोल्हापूर निर्मित जीयारथ हा मराठी, हिंदी, उर्दू प्रेम साहित्याची संगीतमय प्रेमयात्रा हा आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची असून, सुरेश जोंधळे आणि मकरंद दिवाकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होणार आहे. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
प्रवेश द्वाराजवळ अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्त मदत निधीसाठी एक कक्ष आणि बॉक्स ठेऊन मदतीचे आवाहन संयोजन समितीने केले होते त्यास नांदेडकर मंडळीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.






