गोदावरी पात्रातील अवैध रेती उपसा व वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा छापा; 42.25 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड – एका प्रकरणावरून काही दिवस मुख्यालय अटॅच करण्यात आलेले नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची ग्रामीण ठाण्यातच नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा चिंचोलकरांनी नवी उभारी घेत, वाळू माफियांच्या मुस्क्या आवळायला सुरुवात केली आहे. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत मोठी कारवाई करत गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्या माफियांवर त्यांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी 42 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, विष्णुपुरी शिवारात गोदावरी नदीतून तराफ्यांच्या मदतीने अवैध रेतीचा उपसा सुरू आहे. या माहितीच्या आधारे दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा वाजता पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी, एक आरोपी पोलिसांना पाहून नदीत उडी मारून पळून गेला.
घटनास्थळावरून पोलिसांनी अंदाजे १० ब्रास रेती अंदाजे किंमत 50 हजार रुपये आणि रेती उपसा करण्यासाठी वापरलेले तीन तराफे 1 लाख 50 हजार रुपये असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, काही साहित्य कटरने कापून आणि जाळून जागेवरच नष्ट करण्यात आले.
याच मोहिमेअंतर्गत, हस्सापूर रोडवरील गोदावरी पुलाजवळ पोलिसांनी MH26BE 4303 या हायवा ट्रकवर छापा टाकला. या ट्रकमध्ये बेकायदेशीरपणे 5 ब्रास रेतीची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ट्रकचालक हिराचंद संभाजी भोकरे (वय 41) याला ताब्यात घेतले आणि ट्रकसह एकूण 40 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही घटनांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार चार वेगवेगळ्या कायद्यांखाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी या यशस्वी कारवाईबद्दल पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांच्यासह संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांचे कौतुक केले आहे.






