शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही, तर ती एक भावना आहे’ – चैतन्य अंबेकर यांचे गौरवोद्गार
नांदेड – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नुकतीच विष्णुप्रिया अंबेकर, वय 48, या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. परभणीहून उपचारासाठी आलेल्या अंबेकर यांचे नातेवाईक, चैतन्य अंबेकर यांनी रुग्णालयातील सेवा आणि वातावरणाचे कौतुक केले.
चैतन्य अंबेकर म्हणाले, “आम्ही अनेक रुग्णालयांचे अनुभव घेतले, पण येथे दाखल झाल्यानंतर जे वातावरण अनुभवायला मिळाले, ते खरोखरच मनाला स्पर्शून गेले. येथे प्रत्येक रुग्णाची त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली जाते.” त्यांनी रुग्णालयातील स्वच्छता, शिस्त, सेवा, आणि सहानुभूतीचे विशेष कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, “रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही, तर ती एक भावना आहे. ती भावना आम्हाला येथे जाणवली. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे. त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”
परभणी येथील ४८ वर्षीय विष्णुप्रिया अंबेकर यांना पोटाचा गुंतागुंतीचा हर्निया झाला होता. त्यांच्यावर यापूर्वी तीन वेळा शस्त्रक्रिया झाली होती. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड येथे २८ जून रोजी त्यांना दाखल करण्यात आले. शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. अनिल देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील बोंबले यांनी त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
रुग्णालयातील शिस्तबद्ध प्रशासन, स्वच्छता आणि रुग्ण-नातेवाईकांसोबतचा संवेदनशील संवाद यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैतन्य अंबेकर यांनी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विद्याधर केळकर, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद देवसरकर, अधिसेविका श्रीमती. अल्का जाधव, तसेच शल्यचिकित्सा विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी, निवासी डॉक्टर, आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.






