नांदेडमध्ये १०० कोटींच्या सीसीटीव्ही प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळणार: गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन
नांदेड -शहरात सीसीटीव्ही यंत्रणा आणि नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी शासनाकडे सादर करण्यात आलेला १०० कोटी रुपयांच्या कामाचा प्रलंबित प्रस्ताव तपासून त्याला मान्यता देण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश दिले जातील, असे आश्वासन गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आमदार श्रीजया चव्हाण यांना दिले आहे.
मंगळवारी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात श्रीजया चव्हाण यांनी यासंदर्भात उपप्रश्न विचारला होता. त्यांनी निदर्शनास आणून दिले की या प्रस्तावाला शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे, परंतु अद्याप निधी मिळालेला नाही. तो तात्काळ देण्यात यावा, यासोबतच नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठीही तरतूद करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. सीसीटीव्हीच्या देखभाल व दुरुस्ती संदर्भात विचारलेल्या अन्य उपप्रश्नावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, या कामासाठी संपूर्ण राज्यात एकसूत्रता आणण्यासाठी गृह विभाग लवकरच एक ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (SOP) तयार करून वितरित करेल. नांदेड शहरातील सीसीटीव्हीच्या प्रस्तावालाही लवकरच मान्यता देण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री भोयर यांनी दिले आहे.






