नांदेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई: १६ लाखांच्या गुटख्यासह प्रतिबंधित अन्नसाठा जप्त
नांदेड – अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने नांदेडमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत १६ लाख २८ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहायक आयुक्त संजय चट्टे आणि सहायक आयुक्त राम भरकड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत मिसे, अरुण तम्मडवार, तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी, शिल्पा श्रीरामे, अमृता दुधाटे, नमुना सहायक बालाजी सोनटक्के आणि इतवारा पोलिस स्टेशनचे पो कॉ हरप्रीतसिंग सुकई यांच्या पथकाने मे. डायमंड ट्रेडर्स, अमेर फंक्शन हॉलजवळ, देगलूर नाका, नांदेड येथील पेढीवर छापा टाकला.
या तपासणीदरम्यान, पेढीमध्ये सय्यद मुबीन सय्यद गनी (वय ५१) आणि अजमोदिद्दिन अब्दुल हमीद (वय ४०) हे उपस्थित होते. पथकाला पेढीमध्ये राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, AAA पानमसाला, मुसाफीर पानमसाला, आरएमडी पानमसाला, रजनीगंधा पानमसाला, सिग्नेचर पानमसाला, सितार गुटखा आणि विविध प्रकारचे सुगंधीत तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
या जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत १६ लाख २८ हजार ४९ रुपये इतकी आहे. जप्त केलेला हा प्रतिबंधित साठा इतवारा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून, सय्यद मुबीन सय्यद गनी आणि अजमोदिद्दिन अब्दुल हमीद यांच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार फिर्याद दाखल केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.






