नांदेड-अर्धापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी
नांदेड-अर्धापूर महामार्ग क्र. ३६१ वर फोर्ड शोरूमसमोर शनिवारी दि. १५ मार्च दुपारी भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ वाहनाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात दोन जण ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील पाकिजानगर भागातील काही युवक स्कॉर्पिओ वाहनातून अर्धापूरकडून नांदेड कडे येत होते. महादेव पिंपळगाव फाट्यावर येताच स्कॉर्पिओ (एम एच २६-ए ए ७१११) या चारचाकी वाहनाचा ताबा सुटला आणि ते दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रक (एम एच ०९ जीजे ०१४७) वर जाऊन आदळले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सय्यद हुशेब (वय 32, रा. पाकीजा नगर, नांदेड) व शेख सलाम,वय 30, रा. पाकीजा नगर, नांदेड, हे दोघे जण जागीच मरण पावले. या भीषण अपघातात शेख मस्तान शेख जैनुद्दीन, वय 30, रा. शाहीन नगर, नांदेड, सय्यद रियाज सय्यद गौस, वय 28, रा. पाकीजा नगर, नांदेड, सय्यद फजल सय्यद गौस, वय 27, रा. पाकीजा नगर, नांदेड, ननोद्दीन हबीब खान, वय 18, रा. पाकीजा नगर, नांदेड, शेख रिजवान अलीम, वय 25, रा. पाकीजा नगर, नांदेड व शंकर बोडके (रा. पिंपळगाव, नांदेड हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल केले, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाकुळे यांनी दिली. अपघात स्थळावर या भीषण घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती.
वाहतूक सुरळीत; जखमींवर उपचार सुरू
अपघातानंतर तातडीने सर्व जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे हलवण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
अपघाताचे कारण
घटनास्थळावर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची घटना कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून प्राथमिक अंदाजानुसार, स्कॉर्पिओ वाहनाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे व्हायरल व्हिडिओवरून दिसून येत आहे. पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, महामार्गावर वाहन चालवताना वेग मर्यादेचे पालन करावे आणि सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करावा, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील, असे आवाहन नांदेड पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.






