
नांदेडमध्ये बेफाम होर्डिंगचा धोका वाढला: मुथा चौकात होर्डिंग कोसळले, प्रशासन गप्प का?
नांदेड – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे आणि राज्य सरकारच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन करत नांदेड शहरात अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जचा सुळसुळाट वाढला आहे. आज मुथा चौकात एका मशिदीजवळ एक मोठे होर्डिंग रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली, ज्यामुळे मोठा अपघात टळला. या घटनेने नांदेडकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
मुथा चौकात होर्डिंग पडल्यामुळे रस्त्यावरील वाहने अचानक थांबली आणि मुथा चौक व वजीराबाद भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे अनधिकृत होर्डिंग्जचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे.
गेल्या वर्षी मुंबईतील घाटकोपर येथे मोठे होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी गेला होता. या घटनेनंतर राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी मोठे बॅनर आणि होर्डिंग्ज लावू नयेत, असे आदेश काढले होते. शिवाय, यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शहर विद्रूपीकरणासंदर्भात निर्णय देत बॅनर व होर्डिंग्जवर पूर्णतः बंदी घातली आहे. असे असतानाही, नांदेडमध्ये मात्र गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या आदेशांचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे.
या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनावर मात्र प्रचंड राजकीय दबाव असल्याचे चित्र आहे. यामुळे राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. मंत्र्यांचे दौरे, जाहीर सभा, नेत्यांचे वाढदिवस, मंत्री किंवा राज्यमंत्रीपदी नियुक्ती, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम, धनदांडग्यांचे विवाह सोहळे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राष्ट्रीय कार्यक्रम यासह अनेक प्रसंगी शहरात जागोजागी भले मोठे बॅनर व होर्डिंग्ज झळकविले जातात. ‘साहेबांचाच आदेश’ असल्याने महापालिका प्रशासन या अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जवर कारवाई करण्यास धजावत नाही, अशी चर्चा आहे. यामुळे शहरात अशा अनधिकृत बॅनर व होर्डिंग्जची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. याचा परिणाम म्हणून सामान्य नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालताना किंवा वाहन चालविताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे नव्याने रुजू झाले, तेव्हा त्यांनी बॅनर विषयांवर खूप जोमाने कारवाई सुरू केली होती. त्यांनी ठिकठिकाणी बॅनरस्पॉट निश्चित केले आणि तिथे बॅनर लावण्यासाठी मोठ्या लोखंडी फ्रेम्सही उभ्या केल्या. मात्र, कोणीही याचा वापर करत नाही आणि बॅनरचा सुळसुळाट कमी होण्याचे नाव घेत नाही.
नांदेडकरांकडून आता हाच प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासनाला आणि मनपा आयुक्तांना एखाद्या मोठ्या अपघाताशिवाय जाग येणार नाही का? नागरिकांच्या जीविताशी होणारा हा खेळ थांबवण्यासाठी तात्काळ कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.