भर पावसात हजारोंच्या उपस्थितीत महाविहार बावरीनगर येथे
वर्षावास प्रारंभ व धम्मदेशना कार्यक्रम उत्साहात संपन्न
Nanded Vruttavedh
दाभड (ता. अर्धापूर) – महाविहार बावरीनगर, दाभड येथे आषाढ पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला वर्षावास प्रारंभ, धम्मदेशना तथा विविध धार्मिक कार्यक्रम भर पावसातही हजारो श्रद्धावान उपासक-उपासिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत अत्यंत श्रद्धामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक ध्यानसाधना, बुद्धवंदना, त्रिशरण व अष्टशील ग्रहणाने झाली. त्यानंतर प्रमुख धम्मदेसनेसाठी उपस्थित असलेल्या श्रद्धेय भिक्खू विनयबोधिप्रिय महाथेरो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावी धम्मदेसनेतून त्यांनी भगवान बुद्धांनी निर्धारित केलेल्या वर्षावासाच्या उद्देश व महत्त्वाचे सविस्तर विवेचन केले. वर्षावास हा केवळ भिक्खू संघाचा निवासकाळ नसून मलीन असलेल्या मनाला स्वच्छ करणे, धम्मअभ्यास, चिंतन, मनन आणि समाजप्रबोधनाचा महत्त्वपूर्ण कालखंड असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी श्रद्धेय भिक्खू प्रा. डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, श्रद्धेय भिक्खू विनयबोधिप्रिय महाथेरो, श्रद्धेय भिक्खू रेवतबोधी थेरो आणि श्रद्धेय भिक्खू बुद्धभूषण हे उपसंपदा झालेले चार भिक्खू महाविहार बावरीनगर येथे वर्षावास करणार असून या कालावधीत नियमित धम्मदेशना, ध्यानसाधना, त्रिशरण-अष्टशील तसेच विविध धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुसळधार पाऊस सुरू असतानाही परिसरातील तसेच नांदेड आणि इतर भागांतील हजारो धम्मानुयायी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून कार्यक्रमात सहभागी झाले. श्रद्धावानांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले. त्यांनी उपस्थित भिक्खू संघ, धम्मानुयायी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले.
महाविहार बावरीनगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षावासाची परंपरा अत्यंत श्रद्धाभावाने सुरू झाली असून, आगामी तीन महिन्यांत धम्म, समता, करुणा आणि बंधुत्वाच्या मूल्यांचा व्यापक प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.






