नांदेडमध्ये अवैध गावठी पिस्तुलांची विक्री करणारी टोळी गजाआड; ४ पिस्तुले व १३ जिवंत काडतुसांसह १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका टोळीचा पर्दाफाश करत धडक कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांचे पथक १३ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड शहर परिसरात शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत होते. त्यादरम्यान तीन इसम काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून गावठी पिस्तुल घेऊन नांदेड शहराकडे येत असल्याची गुप्त माहिती बातमीदाराकडून मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वाघी शिवारातील नाळेश्वर ते सुगाव जाणाऱ्या रस्त्यावरील एका आखाड्यासमोर सापळा रचला. काही वेळाने संशयित मोटारसायकल (MH-26-DA-4169) तीन प्रवाशांसह येताना दिसताच पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान पोलिसांनी आनंद उर्फ चिन्हू सरदार यादव (वय २६, रा. वजीराबाद, नांदेड) याच्याकडून २ गावठी पिस्तुले आणि ६ जिवंत काडतुसे जप्त केली. तर त्याचा दुसरा साथीदार शेख जावेद उर्फ लड्या रेहमत शेख (वय २२, रा. विष्णुपुरी, नांदेड) याच्याकडून २ गावठी पिस्तुले आणि ७ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
या कारवाईदरम्यान त्यांचा तिसरा साथीदार शेख सोहेल उर्फ छोटा गुर्जर (रा. वजीराबाद, नांदेड) हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पकडलेल्या आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा शस्त्र परवाना नव्हता.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही अग्निशस्त्रे मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील टेंबुर्णी येथील ‘छोटूसिंग’ नावाच्या इसमाकडून नांदेडमध्ये विक्रीसाठी आणल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी आरोपींवर लिंबगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०३/२०२६ कलम ३, ७, २५ भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकूण १,२०,००० रुपये किमतीची ४ गावठी पिस्तुले, २६,००० रुपयांची १३ जिवंत काडतुसे आणि स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण १,९१,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अवैध शस्त्र पुरवठ्याची साखळी उध्वस्त करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.





