
सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांची चौकशी करण्याचे प्रादेशिक उपसंचालकाचे आदेश
-नांदेड – येथील सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांच्या भ्रष्ट कामाची चौकशी करण्याचे आदेश प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग लातूर यांनी दिले आहेत. निलगिरी यांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्ययी समिती गठित करण्यात आली आहे.
नांदेड येथील सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांचे संस्थाचालक यांच्याशी संगणमत करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपक कसबे व पंकज कांबळे यांनी अनेकदा वरिष्ठांकडे केली होती. याच मागणीसाठी दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी लातूर येथील उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली होती.
या उपोषणाची दखल घेत प्रादेशिक उपसंचालक यांनी शिवानंद मिनगिरे यांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ज्यामध्ये लेखाधिकारी मनोज सकट, सहाय्यक लेखाधिकारी श्रीप्रसाद बोरसे आणि कार्यालय अधीक्षक एस. बी. नटवे यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळातून शासन ध्येय धोरण व शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षण उपलब्ध होत नसून सहाय्यक संचालक ईमाबक नांदेड शिवानंद मिनगिरे हे संस्थाचालक यांच्याशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा शासनाचा निधी हडप करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपक कसबे व पंकज कांबळे यांनी केली होती.
शासनाच्या ध्येय धोरणानुसार या शाळेच्या शैक्षणिक संकुलनाची इमारत व वस्तीगृह इमारत या दोन वेगवेगळ्या इमारती अस्तित्वात असाव्यात अशी तरतूद आहे .
त्याचबरोबर शाळेची इमारत वस्तीगृह व क्रीडांगणाचे क्षेत्रफळ महानगरपालिका तथा जिल्हास्तरीय शाळांसाठी दोन एकर तर नगरपंचायत किंवा नगरपरिषद स्तरावरील शाळेसाठी तीन एकर त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्रात असणाऱ्या शाळांसाठी चार एकर जमीन असावे असे निर्देश आहेत.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबत वार्षिक तपासण्या करण्याचे शासनाचे सक्त आदेश आहेत. परंतु वरील प्रकारे कुठल्याही नियमांचे पालन या शाळांकडून केले जात नाही. शिवानंद मिनगिरे यांनी या शाळांच्या संस्था चालकांशी हात मिळवणी करून व आर्थिक तडजोडी करून संगणमताने कोट्यवधी रुपयांचा निधी हडप केल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शाळेत प्रवेशित धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांची संख्या बोगस व बनावट असण्याची दाट शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले होते.
या गंभीर बाबीची दखल घेत प्रादेशिक उपसंचालकाने या प्रकरणी तात्काळ निर्णय घेत मिनगिरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करीत असल्याचे लेखी पत्र आदेशित केले आहे.