
अखेर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार बदलला
इंजि. प्रशांत इंगोले यांना नांदेड उत्तर विधानसभेची उमेदवारी
नांदेड – स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन अखेर वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक समन्वय समितीने प्राध्यापक गौतम दुथडे यांची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांच्या ऐवजी आता नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून इंजि. प्रशांत इंगोले यांना उमेदवारी देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी शनिवारी जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची व आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वीच राज्यभरासह नांदेडातही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवार निश्चित केले. त्यात लोहा – कंधार मतदार संघातून शिवा नरंगले यांना, ८७-नांदेड दक्षिण मतदार संघातून फारुख अहमद तर ८६- उत्तर मतदार संघातून प्रा. गौतम दुथडे यांना उमेदवारी देण्यात आली. लोहा – कंधार मतदार संघातून शिवा नरंगले यांना जनतेनेच नोटांचा हार घालून आर्थिक मदत देत त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. शिवा नरंगले यांना लोकांनी स्वीकारले. तर दक्षिण नांदेडमध्ये फारूक अहमद यांच्या उमेदवारीवर कुणीही आक्षेप घेतला नाही. परंतु उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघात प्राध्यापक गौतम दुथडे यांच्या नावाला सुरुवातीपासूनच विरोध होता. उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यासोबतच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील गौतम दुथडे यांच्या उमेदवारीमुळे नाराजी पसरली होती. अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गौतम दुथडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतले. नांदेड उत्तरचा उमेदवार बदलून द्या, अशी मागणीही केली. हीच मागणी विचारात घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक समन्वय समितीने दुधड्यांची उमेदवारी बदलून इंजिनियर प्रशांत इंगोले यांना देण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा निवडणूक समन्वय समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, सह अध्यक्ष अशोक सोनवणे व प्राध्यापक धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशांत इंगोले यांच्या उमेदवारीमुळे नांदेड उत्तर मतदार संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.