नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली
नांदेड: दिवाळीच्या सुटीनंतर कामावर परतणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा सामना करत, नांदेड विभागाने दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी एकाच दिवसात तब्बल २ लाख ७६ हजार १९९ प्रवाशांची रेल्वे वाहतूक यशस्वीरीत्या हाताळून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
या विक्रमी प्रवासी संख्येमध्ये ५७ हजार ७६५ आरक्षित प्रवासी आणि २ लाख १८ हजार ४३४ अनारक्षित प्रवाशांचा समावेश आहे.
दिनांक २६ ऑक्टोबर रोजी हजूर साहेब नांदेड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या प्रमुख स्थानकांवर प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ नोंदवली गेली. या दिवशी एकट्या हजूर साहेब नांदेड स्थानकावर ७१ हजार ८९६ प्रवाशांची नोंद झाली, जी मागील वर्षीच्या दररोजच्या सरासरी ४४ हजार ६०९ प्रवाशांपेक्षा खूप जास्त आहे.
याचबरोबर परभणी स्थानकावर ३९ हजार ०५६ प्रवाशांनी प्रवास केला, तर छत्रपती संभाजीनगर स्थानकावर ४९ हजार ०७८ प्रवासी नोंदवले गेले. मागील वर्षीच्या अनुक्रमे २६ हजार १५७ व ३१ हजार ४३६ च्या सरासरीपेक्षा ही संख्या खूपच अधिक आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड विभागाने दिवाळी विशेष गाड्या चालवल्या, तसेच काही नियमित गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून आसनक्षमता वाढवली. प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी विभागाने उच्च दर्जाची वेळ पाळली. ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी विभागाने अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या. यामध्ये अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती, गर्दी नियंत्रण व्यवस्था, प्रवासी मार्गदर्शन, सुरक्षा उपाययोजना मजबूत करणे तसेच ‘रेल मदत’ आणि स्टेशन हेल्पडेस्कद्वारे तत्काळ सहाय्य उपलब्ध करून देणे यांचा समावेश होता.
नांदेड विभागाची ही विक्रमी कामगिरी विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या सुनियोजित उपाययोजनांमुळे शक्य झाली. विभागाच्या या यशस्वी नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





