प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड विभागाचा पुढाकार: मराठवाडा एक्स्प्रेस आणि तपोवन एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त डब्यांची जोडणी
नांदेड – सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दीचा ताण कमी करण्यासाठी विभागामार्फत काही गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने, नांदेड विभागाने काही गाड्यांना प्रत्येकी दोन (02) अतिरिक्त जनरल सेकंड क्लास (GS) डबे जोडण्यास मान्यता दिली आहे, यात गाडी क्रमांक 17688/17687 धर्माबाद – मनमाड – धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस, या गाडीला दि 24 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रवासासाठी हे अतिरिक्त डबे जोडले जातील. त्यासोबतच गाडी क्रमांक 17618/17617 नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेस, या गाडीला दि 24 ऑक्टोबर 2025 आणि दि 25 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रवासासाठी हे अतिरिक्त डबे जोडले जातील.
या अतिरिक्त डब्यांमुळे सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी विभागण्यास मदत होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.
या अतिरिक्त सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.






