नांदेडात गणेशोत्सव ‘डीजेमुक्त’ साजरा करण्यासाठी २५० मंडळांचा पुढाकार; जिल्हा प्रशासनाकडून गणेश मंडळांचा सत्कार
नांदेड – नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत आणि आनंदाने साजरा करण्यासाठी ‘पर्यावरणपूरक आणि डीजेमुक्त’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमातून नांदेड जिल्ह्याची एक नवीन ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या जिल्ह्यातील सुमारे २५० गणेश मंडळांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे करण्यात आला. यावेळी या मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
डीजेच्या आवाजाचे दुष्परिणाम, विशेषतः हृदयावर होणारे वाईट परिणाम लक्षात घेऊन जिल्ह्यातील २५० गणेश मंडळांनी स्वतःहून पुढे येऊन ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याची हमी दिली, ही बाब कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. समाजातील नागरिकांनी स्वयंशिस्तीने पुढाकार घेतल्यास अनेक चांगल्या गोष्टी आणि उपक्रम राबवता येतात, असे ते म्हणाले. गणेश मंडळांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन नेहमीच तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सर्व गणेश मंडळांचे आभार मानले. उत्सव काळात शांतता राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळते, त्यामुळे चांगले नियोजन करता येते, असे ते म्हणाले. त्यांनी गणेश मंडळांना विसर्जन काळात रस्ते मार्गात बदल न करण्याचे आणि वेळेचे बंधन पाळण्याचे आवाहन केले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी, उत्सव काळात शांतता राखण्यात समाजाचा मोठा सहभाग असतो, असे सांगितले. ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे पोलीस दलाने स्वागत केले असून, डीजेचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.






