‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नांदेड रेल्वे स्थानकावर उत्साहाचे वातावरण
नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
नांदेड – मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे. ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे 610 किलोमीटरचे अंतर 9 ते 9.30 तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता 500 वरून 1440 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे 8 वरून 20 पर्यंत वाढवण्यात आले आहे.
नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
नांदेड येथे आनंद व उत्साहाचे वातावरण
नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यप्रकाश, विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी, पत्रकार, नागरिक आदीची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण होते.
खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा आज नांदेड रेल्वे स्थानकावरुन शुभारंभ झाला. ही रेल्वे गाडी म्हणजे विकसित महाराष्ट्राच्या प्रगतीचे पहिले पाऊल आहे. या गाडीचा वेळ अजून कमी केला तर सात तासात ही गाडी मुंबईला पोहोचेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नांदेडचे विमानतळही लवकरच सुरु होईल, यामुळे नांदेडच्या विकासात व दळणवळणात खूप मोठा बदल होईल. तसेच वंदे भारत एक्सप्रेसमुळे जिल्ह्याच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल. नांदेड- मुंबई प्रमाणेच नांदेड नागपूरला जोडता आले पाहिजे यामुळे व्यापार व उद्योग वाढीस गती मिळेल. नांदेड ते लातूर व नांदेड ते बिदर रेल्वेमार्ग झाल्यास नांदेड पुण्याला जोडले जाईल व नांदेड येथील विद्यार्थ्यांची सोय होऊन नांदेडच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. वंदे भारत एक्सप्रेस ही नांदेडकरांसाठी अमुल्य भेट असून सर्व सोयीसुविधा या गाडीत आहेत. प्रवाशांनी या रेल्वेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार विक्रम काळे यांनी नांदेड येथून बिदर व लातूर येथे रेल्वे लवकरच सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून नांदेड येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.
वेगवान, सुरक्षित, आरामदायी व सोयीस्कर प्रवास-
मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. आतापर्यंत ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती, पण आता ती प्रथमच नांदेडहून जाणार आहे. ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली असून आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना यात आहे. या मार्गावरील ही सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते. गाडीमध्ये 20 डबे असून 1440 प्रवासी बसण्याची सोय आहे.
असे आहेत फायदे
मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस
नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 09 तास 30 मिनिटांत पूर्ण, इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी
गाडीचे डबे 8 वरून वाढवून 20 करण्यात आले असून, प्रवासी आसन क्षमता 530 वरून 1440 पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे अधिक प्रवाशांना सुविधा मिळणार
महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील एसी प्रवासाची सुविधा
हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना उत्कृष्ट व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो
वारंवार प्रवास करणारे प्रवासी, भाविक, कर्मचारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त
पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा होतो.
वेळापत्रक नांदेड – मुंबई सीएसएमटी – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस
गाडी क्रमांक २०७०५ – हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (बुधवार वगळता)
सकाळी ५.०० प्रस्थान, स. ५.४० वा. परभणी, स. ७.२० वा. जालना, स. ८.१३ वा. छत्रपती संभाजीनगर, स. ०९.५८ वा, मनमाड, स. ११.०० वा. नाशिक रोड, दु. ०१.२० वा. कल्याण, दु. ०१.४० वा. ठाणे, दु. ०२.०८ वा. दादर, दु. ०२.२५ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन.
गाडी क्रमांक २०७०६ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड (गुरुवार वगळता)
दुपारी १.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून प्रस्थान, दु. ०१.१७ वा. दादर, दु. ०१.४० वा. ठाणे, दु ०२.०४ वा. कल्याण, दु. ०४.१८ वा. नाशिक रोड, दु. ०५.१८ वा. मनमाड, सायंकाळी ६.४८ वा. छत्रपती संभाजीनगर, रात्री ०७, ४३ वा. जालना, रात्री ९.३३ वा. परभणी, रात्री १०.५० वा. नांदेड येथे आगमन.






