पोलिसांच्या प्रयत्नांनी कंबोडियातून सुखरूप परतला नांदेडचा तरुण
नांदेड- नोकरीच्या आमिषाने एजंटमार्फत कंबोडियाला गेलेला नांदेडचा तरुण शेख समीर शेख महेबुब (वय २५, रा. रहिमपूर वसरणी) याला तेथे जबरदस्तीने बेकायदेशीर क्रिप्टो करन्सी स्कॅमचे काम करण्यास भाग पाडण्यात आले. या कामास नकार दिल्याने त्याला मारहाण करून त्याचे व्हिडीओ त्याच्या कुटुंबियांना पाठवून पैशांची मागणी करण्यात आली.
ही बाब लक्षात येताच चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची भेट घेऊन त्यांना सर्व हकीकत सांगितली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कार्यवाही सुरू केली. त्यांनी लागलीच कंबोडियातील भारतीय दूतावास कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांच्या संपर्कात राहून पाठपुरावा सुरू केला.
त्यांनी शेख समीरच्या नातेवाईकांना दिल्लीतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी एक पत्र दिले. नातेवाईकांनी तिथे जाऊन तक्रार नोंदवली. त्यानंतरही पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी भारतीय दूतावासाकडून सतत पाठपुरावा केला.
या प्रयत्नांना अखेर यश आले आणि १४ ऑगस्ट रोजी शेख समीर सुरक्षितपणे भारतात परत आला. आपल्या मुलाला सुखरूप परत पाहून नातेवाईकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी पोलीस प्रशासन, विशेषतः पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, खा. रवींद्र चव्हाण, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांचे आभार मानले.
परत आलेल्या शेख समीरचे पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.






