नांदेड पोलिसांचे ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ यशस्वी: अवैध रेती उत्खनन थांबवले, लाखोंचा मुद्देमाल जप्त
नांदेड – पोलीस अधीक्षक अबीनाशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत नांदेड पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि साठवणुकीवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत, २४ जून आणि २५ जून, २०२५ रोजी नांदेड ग्रामीण, कुंटूर आणि लिंबगाव पोलीस स्टेशनच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापे टाकले.
नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर, कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले आणि लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरी बोधनकर यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी विष्णुपुरी, असर्जन, राहेर आणि सुगाव येथील गोदावरी नदीपात्रात ही कारवाई केली. यावेळी इंजिन आणि तराफ्यांचा वापर करून बेकायदेशीररित्या वाळूचे उत्खनन करून वाळू जमा केली जात असल्याचे आढळून आले.
या छाप्यात, नदीपात्रातून २ इंजिन, ७ वाळू काढण्याचे तराफे आणि सुमारे २० ब्रास अवैध वाळू असा एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेतला असून, तराफे जागीच जाळून नष्ट करण्यात आले आहेत.
याप्रकरणी, नांदेड ग्रामीण आणि कुंटूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध अवैध वाळू उत्खननाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’मुळे अवैध वाळू माफियांना मोठा धक्का बसला असून, यापुढेही अशी कारवाई सुरूच राहील, असे संकेत मिळत आहेत.






