- मीनल करनवाल यांची बदली; मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी
नांदेड-कालच 22 कोटी 26 लाख रुपयांचा नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची बदली करण्यात आली आहे. जळगाव जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर किनवट येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मेघना कावली यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी 18 मार्च रोजी काढण्यात आले. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मागील दीड वर्षांपूर्वी मिनल करनवाल यांची नियुक्ती झाली होती. मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. अचानक निघालेल्या या बदलीच्या आदेशामुळे अनेकांना आश्चर्य वाटू लागले आहे. त्यांच्या जागेवर किनवट येथील प्रशिक्षणार्थी असणाऱ्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदीवासी प्रकल्प तथ सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट मेघना कावली यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली केल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान मेघना कावली या 2021 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी असून संपूर्ण भारतातून 83 वा रँक त्यांनी मिळवला होता. मुळात बेंगलुरु कर्नाटक येथील रहिवाशी मेघना कावली यांनी आयटीसीसह देशातल्या महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता घेऊन भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये समाविष्ट झालेल्या मेघना कावली या नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आल्या आहेत. आता तरी नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणार काय? याकडे मेघना कावली यांच्या नियुक्तीने सर्वांचे लक्ष लागले आहे.






