विद्युत विभागाचे प्रमुख सतीश ढवळे निलंबित; मनपा आयुक्तांची कारवाई वादाच्या भोवऱ्यात
नांदेड: महानगरपालिकेच्या विद्युत विभागाची धुरा गेल्या दीड दशकांपासून खंबीरपणे सांभाळणारे उपअभियंता सतीश ढवळे यांना मनपा आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. मुळात महानगरपालिकेचा ‘१०० दिवस कार्यक्रम’ हा वर्षानुवर्षे रखडलेल्या जुन्याच कामांची गोळाबेरीज असल्याची चर्चा असताना, या कारवाईमुळे कर्मचारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या निर्णयाने महापालिकेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
ढवळे यांच्यावर ठेवण्यात आलेले ठपके वस्तुस्थितीला धरून नसल्याचे बोलले जात आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमाला अजून ३० दिवस शिल्लक असताना, केवळ ७० दिवस उलटले म्हणून ‘उद्दिष्टपूर्ती केली नाही’ असा निष्कर्ष काढणे अन्यायकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विहित मुदत संपण्यापूर्वीच अशा प्रकारची कारवाई करणे हे नियमांना बगल देणारे असून, प्रशासकीय घाईगडबडीचा हा नमुना असल्याची टीका आता होत आहे.
कार्यालय बंद न करता निघून जाणे आणि विभागावर नियंत्रण नसल्याचा जो दुसरा ठपका ठेवण्यात आला आहे, त्यामागेही वेगळे कारण समोर येत आहे. विद्युत विभागात सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने कार्यालयाच्या कुलुपाची एक चावी संबंधित कंत्राटदाराकडे आहे. ढवळे कार्यालय सोडून गेल्यानंतर कंत्राटदाराने किंवा त्याच्या कामगारांनी कामासाठी कार्यालय उघडले असण्याची दाट शक्यता आहे. या तांत्रिक बाबीचा विचार न करता थेट निलंबनाची कारवाई केल्याने ही कृती सूडबुद्धीने तर केली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे विविध सामाजिक संघटना व सोशल मीडिया पोस्टनुसार महापालिकेत विशिष्ट समाजाच्या अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करून निलंबित केले जात आहे. यापूर्वी अनधिकृत नळ जोडणीला अधिकृत करून मनपाला कोट्यवधीचे कायम आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत मिळवून देणारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांच्यावर दोनवेळा निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अलीकडेच देगलूर नाका परिसरात चार चिमुकल्यांचा पाण्याच्या साचलेल्या डबक्यात बुडून मृत्यू झाला होता. याही प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार मनपाने केला. गुत्तेदार व विभागप्रमुख आणि संबंधित उपअभियंत्याला केवळ नोटीस बजावून उपअभियंता किरण सूर्यवंशी व शिवकन्या जायभाये यांना बळीचे बकरे करून, त्यांचे निलंबन केले गेले. गुत्तेदार व कार्यकारी अभियंता, जबाबदार उपअभियंता यांना प्रकरणातून सहिसलामत बाहेर काढले गेले, असे आरोप सामाजिक संघटना व माध्यमांनीही केले आहेत.
याच पद्धतीने उपअभियंता सतीश ढवळे यांनाही चुकीचे ठपके ठेवून निलंबित करण्यात आले आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे उपअभियंता सतीश ढवळे यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.





